टोरेस’नंतर दादरमध्ये आणखी एक घोटाळा; १५० गुंतवणूकदारांना घातला १० कोटी रुपयांचा गंडा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दादरच्या ‘कोहिनूर स्क्वेअर’मध्ये कार्यालय असलेल्या निओग्रीन व्हेंचर प्रा. लि. कंपनीने गुंतवणुकीच्या नावाने १५० जणांची १० कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कंपनीसह सचिन फडतरे, निखिल शेलार आणि साथीदारांविरोधात शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींच्या घर, कार्यालयात झाडाझडती सुरू केली आहे.
तक्रारदार आरती कौस्तुभ ठाकरे या कांदिवलीत नोकरीला आहेत. त्यांच्या पतीचा मित्र राहुल जोशी हा निओग्रीन कंपनीत सेल्स मॅनेजर होता. त्याने कौस्तुभ यांना कंपनीच्या गुंतवणूक योजनेबाबत माहिती दिली. पाच वर्षांसाठी कंपनीत पाच लाख रुपये गुंतविल्यास साडेबारा लाख रुपये मिळणार होते. ठाकरे दाम्पत्याने कंपनीच्या कार्यालयास भेट दिली. फडतरे आणि शेलार यांनी कंपनी मोरिंगा पावडरचे उत्पादन घेते, तो माल परदेशात एक्सपोर्ट केला जातो, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गुंतवणूकदारांना व्याज दिले जाते, असे सांगितले.
फडतरे आणि शेलार यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठाकरे दाम्पत्याने पाच वर्षांच्या गुंतवणुकीत ५० टक्के वार्षिक परतावा योजनेंतर्गत गुंतवणुकीस होकार दिला.सहा लाख रुपये त्यांनी गुंतवले. तर, आरती यांच्या आई दीपाली सापळे यांनी २ लाख गुंतवले. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यांपर्यंत आरती यांना पावणेदोन लाख रुपये मिळाले. त्यानंतर फडतरे व त्यांची कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली. वारंवार पाठपुरावा करून आरती यांनी काही रक्कम परत मिळविली.
फडतरे आणि शेलार यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले. रक्कम न मिळाल्याने आरती यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये गुगलवर कंपनी फ्रॉड असल्याबाबत रिव्ह्यू दिला. त्यानंतर अनेक व्यक्तींनी देखील कंपनी ही फ्रॉड असल्याबाबत मत नोंदविले.