गाडी हळू चालवण्याच्या सूचनेवरून टिटवाळ्यात घरावर हल्ला; तिघे जखमी

Spread the love

गाडी हळू चालवण्याच्या सूचनेवरून टिटवाळ्यात घरावर हल्ला; तिघे जखमी

पोलीस महानगर नेटवर्क

टिटवाळा : वाहन हळू चालवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर हल्ला करत घराची तोडफोड व मारहाण केल्याची घटना कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात घडली. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आंबेडकर चौक टिटवाळा परिसरातील आर. के. चाळ, राजेश्वरी बिल्डिंगजवळ घडली. तक्रारदार झुल्फेकर अली अब्दुल्ला खान (वय ५०) हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशनचे काम करतात. ३ मार्च रोजी ते घराबाहेर उभे असताना एक तरुण मोटारसायकल वेगात चालवत परिसरातून जात होता. त्याला गाडी हळू चालवण्याची सूचना केल्याने वाद निर्माण झाला.

यानंतर काही वेळातच संबंधित तरुण आपल्या वडिलांसह आणि इतर साथीदारांना घेऊन घटनास्थळी परतला. त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तूंनी घराची तोडफोड केली तसेच तक्रारदाराच्या डोक्यावर प्रहार केला. तोंडावर मारहाण झाल्याने त्यांचे दोन दात पडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही आरोपींनी ठोसे-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकूण तीन जण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी पाच जणांविरोधात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon