एमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने डॉक्टरची ७.१० लाखांची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : वैद्यकीय शिक्षणातील प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा आणखी एक प्रकार समोर आला असून यावेळी एका डॉक्टरलाच गंडा घालण्यात आला आहे. मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत ७ लाख १० हजार रुपये उकळल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अभिषेक मौर्य (रा. हिंजवडी) याच्याविरोधात पिंपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार डॉ. विनय मारुती माने (रा. चिंचवड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदारांच्या मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने एन. वाय. तासगावकर कॉलेज या महाविद्यालयाचे हुबेहूब दिसणारे बनावट वेबपेज तयार केले होते. या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे भासवून त्याने तक्रारदारांकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एकूण ७ लाख १० हजार रुपये उकळल्याचे सांगितले जाते.
मात्र, प्रवेश न मिळाल्याने तक्रारदारांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. उलट डॉक्टरलाच धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.