कल्याण-डोंबिवलीत विजेचा धक्का; दोन वेगवेगळ्या घटनांत दोन कामगारांचा मृत्यू
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना रविवारी घडल्या. या दोन्ही प्रकरणांत अपघाती मृत्यूची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पहिली घटना कल्याण-शिळ महामार्ग वरील काटई गावातील एका बिर्याणी दुकानात घडली. अजयकुमार दसई गौतम (वय २०), मूळ उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी, गेल्या महिन्याभरापासून या दुकानात काम करत होता. रविवारी रात्री दुकानाची आवराआवर सुरू असताना ओल्या हाताने लोखंडी बाकाला स्पर्श होताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
दुसरी घटना कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात घडली. संदीप घोरीलाल रावत (वय ३५) याचा पाणी पंपातून आलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची नोंद खडकपाडा पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
दोन्ही घटनांमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करून विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.