‘माझी मुंबई’ कॅनव्हासवर उतरली बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त ५१ ठिकाणी बाल चित्रकला स्पर्धा; महापौरांसह मान्यवरांचा सहभाग
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५–२६ आज मुंबईतील ५१ ठिकाणी उत्साहात पार पडली. शहरभर रंग, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा झाला.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी रितू तावडे यांनी घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगरमधील आचार्य अत्रे मैदानाला भेट दिली. महापौरांनी स्वतः हातात कुंचला घेऊन कॅनव्हासवर चित्र रेखाटत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माटुंगा येथील फाईव्ह गार्डनमध्ये शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.
ग्रँट रोड (पश्चिम) येथील ऑगस्ट क्रांती मैदानात महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट देऊन स्पर्धेचा आढावा घेतला. वांद्रे परिसरातील एमआयजी क्लब येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
यावेळी उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून बालकलाकारांना शहराबद्दलची आपली दृष्टी व्यक्त करण्याची संधी मिळाली असून ‘माझी मुंबई’ ही संकल्पना रंगरेषांतून साकारताना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.