डोंबिवलीत तरुण विद्यार्थिनीच्या बँक खात्यात तब्बल २ कोटी ६० लाख रुपये जमा; मात्र या प्रकरणी पोलिसांची टाळाटाळ
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवलीतून एक खळबळजनक घटना समोर आली असून एका तरुण विद्यार्थिनीच्या बँक खात्यात तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या खात्यात एवढी मोठी रक्कम आली कशी, असा सवाल करत या विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
मात्र पोलिसांनी या प्रकरणी टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. आता या प्रकरणात मनसेने उडी घेतल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात राहणारी निधी तिवारी ही विद्यार्थिनी कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. निधीची मैत्रीण चांदनी सिंह ही आरबीएल बँकेत कार्यरत आहे. चांदनीने तिला बँक खाते उघडण्याचे टारगेट असल्याचे सांगून निधीला विश्वासात घेतले आणि तिची तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली.
खाते उघडण्यासाठी चांदनीने निधीला काही पैसेही दिले होते. मात्र, काही दिवसांनंतर निधीला तिच्या एका खात्यात २ कोटी ६० लाख रुपये आणि दुसऱ्या खात्यात १० लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याचे समजले, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला. निधीने या व्यवहारांबाबत चांदनीकडे विचारणा केली, तेव्हा तिने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. निधीने स्वतः या प्रकरणाचा शोध घेतला असता, तिला धक्कादायक माहिती मिळाली.
उत्तराखंडमधील सामान्य नागरिकांची फसवणूक करून जमा झालेली रक्कम निधीच्या खात्यात वळवण्यात आली होती आणि तिथून ती वापरली गेली होती. या संपूर्ण रॅकेटमध्ये उल्हासनगरमधील एका व्यक्तीचा समावेश असल्याचेही समोर आले असून निधीने या सर्व बाबींची माहिती पोलिसांना दिली आहे.