लग्नाआधी अंडकोष शस्त्रक्रियेची माहिती लपवली; आठ वर्षांनंतर वैवाहिक फसवणुकीचा भांडाफोड

Spread the love

लग्नाआधी अंडकोष शस्त्रक्रियेची माहिती लपवली; आठ वर्षांनंतर वैवाहिक फसवणुकीचा भांडाफोड

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याणमध्ये वैवाहिक आयुष्याशी संबंधित एक गंभीर आणि धक्कादायक तक्रार समोर आली आहे. मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेल्या पतीने विवाहापूर्वी केलेल्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियेची माहिती लपवून विवाह केल्याचा, तसेच विवाहानंतर शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाणे येथे फसवणूक आणि कौटुंबिक छळाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

तक्रारदार महिला उच्चशिक्षित असून मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. आठ वर्षांपूर्वी तिचा विवाह ठाण्यातील मर्चंट नेव्हीत नोकरी करणाऱ्या तरुणाशी हिंदू विवाहपद्धतीनुसार झाला होता. विवाहानंतर दोघे हनिमूनसाठी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. मात्र त्या काळापासूनच पतीकडून भावनिक आणि शारीरिक दुरावा जाणवत असल्याचा दावा महिलेनं केला आहे.

तक्रारीनुसार, पतीच्या एका अंडकोषावर विवाहापूर्वी शस्त्रक्रिया करून तो काढण्यात आला होता. ही बाब पतीने तसेच त्याच्या आई-वडिलांनी जाणूनबुजून लपवून ठेवल्याचा आरोप महिलेनं केला आहे. विवाहानंतर लैंगिक संबंधांबाबत अडचणी जाणवू लागल्यानंतर हा प्रकार हळूहळू समोर आला. याबाबत विचारणा केल्यावर पतीने सहकार्य करण्याऐवजी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं तक्रारीत नमूद आहे.

इतकंच नव्हे तर सासू-सासऱ्यांनीही दबाव टाकत मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर आठ वर्षांनंतर महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, पतीकडून पत्नीला घटस्फोटाची मागणी करण्यात येत असल्याची माहितीही पुढे आली आहे.

या प्रकरणामुळे विवाहापूर्वी मुलाकडून किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून महत्त्वाची वैद्यकीय माहिती लपवली गेल्यास कायदेशीर आणि सामाजिक परिणाम किती गंभीर ठरू शकतात, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सर्व बाबींची शहानिशा केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon