अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबाराचा कट; शस्त्रपुरवठादार ‘बॉबी कबुतर’ पोलिसांच्या ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी हिच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि तिच्या निवासस्थानावर गोळीबार करण्याचा कट रचण्यात सहभागी असलेल्या टोळीला उधळून लावत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा पुरवणारा कुख्यात आरोपी ‘बॉबी कबुतर’ याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करण्याच्या योजनेसाठी आवश्यक असलेली घातक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बॉबी कबुतर याच्यावर होती. या कटाबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शस्त्रपुरवठा साखळीचे धागेदोरे उलगडत पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे हालचाली करत आरोपीला अटक केली.
तपासादरम्यान बॉबी कबुतर याने ही हत्यारे नेमकी कोठून मिळवली, तसेच ती कोणाच्या माध्यमातून इतर गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यात आली, याचा सखोल तपास सुरू आहे. या अटकेमुळे कटामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून कडक उपाययोजना राबवण्यात येत असून, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.