बदलापुरातील धक्कादायक प्रकार!

Spread the love

बदलापुरातील धक्कादायक प्रकार!

रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

बदलापुर – बदलापूरमध्ये घडलेलं बाल लैंगिक अत्याचार प्रकरण राज्यात गाजलं, त्यानंतर संतापाची मोठी लाट उसळळी होती. मात्र,अद्यापही अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचं दिसून येत आहे. बदलापूरमध्ये ट्युशनला जाणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीचा एका रिक्षा चालकाने हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटकही केली.

अंदाजे १० वर्षीय चिमुकलीने विरोध करुनही रिक्षाचालक तिचा हात सोडत नव्हता. अखेर प्रसंगावधान राखत तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने या रिक्षा चालकापासून सुटका करण्यासाठी रिक्षा चालकाच्या डोळ्यात माती फेकली आणि तिथून पळ काढला. बदलापूर पूर्व परिसरातील ही घटना असून आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर, अवघ्या काही तासातच अंबरनाथ येथून पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांनी दिली आहे.

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ६ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल झाली होती, त्यामध्ये मुलीचा हात धरुन विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यानुसार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनात संवेदनशीलपणे लहान मुलांसंदर्भातील गुन्हे हाताळत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon