जुहूत टोयोटा फॉर्च्युनरला दुचाकीची धडक; चालकाकडून धमकी, अज्ञाताविरोधात एनसीआर दाखल
राकेशकुमार आचार्य यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : जुहू परिसरात भररात्री टोयोटा फॉर्च्युनर या आलिशान वाहनाला अज्ञात दुचाकीस्वाराने मागून धडक देत वाहनचालकाला उघड धमकी दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात असंज्ञेय गुन्ह्याची (एनसीआर) नोंद करण्यात आली आहे.
याबाबत राकेशकुमार जयंतीलाल आचार्य (वय ५७, व्यवसाय – कन्सल्टंट, रा. अंधेरी–जुहू) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आचार्य यांचा चालक महेश राठोड हा टोयोटा फॉर्च्युनर (एमएच ०२ एफवाय ७४००) वाहनाने पाहुण्यांना अंधेरी स्थानकावर सोडून जुहूकडे परतत होता. मेयर हॉल, जुहू लेन परिसरात एका अज्ञात दुचाकीस्वाराने वाहनाला मागून धडक दिली.
धडकेचा जाब विचारताच संबंधित दुचाकीस्वाराने उद्धट आणि धमकीवजा भाषेत, “आज मागून धक्का लागला आहे, उद्या पुढून धक्का मारीन. आपल्या मालकाला समजावून सांग,” असे म्हणत घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर आचार्य यांनी तातडीने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ३५१ (२) नुसार अज्ञाताविरोधात एनसीआर दाखल करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, अलीकडेच राकेशकुमार आचार्य यांनी ‘लव्ह जिहाद’नंतर आता ‘लोन जिहाद’ या विषयावर परखड भाष्य केले होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या वाहनावर हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने, घटनेच्या वेळी आचार्य वाहनात नसल्याने अनर्थ टळला.
राकेशकुमार आचार्य हे आध्यात्मिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस असून, ते जहाल हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. या घटनेमुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.