४०० कोटींच्या कंटेनर चोरी प्रकरणात मोठी घडामोड; मुख्य संशयित पोलिसांना शरण
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेच्या कंटेनर चोरीच्या संशयातून उभ्या राहिलेल्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक किशोर सावळा यांनी अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधुमीत गोव्यातून कर्नाटक राज्यात जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेला सुमारे ४०० कोटी रुपयांचा कंटेनर नेत असताना चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच कथित चोरीच्या संशयावरून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील संदीप पाटील यांचे अपहरण करून मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप समोर आला.
संदीप पाटील यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, सातवा आरोपी किशोर सावळा याला अटक करण्यात पोलिसांना अद्याप अपयश आले होते, अखेर त्याने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला.
कथित ४०० कोटी रुपयांची रक्कम ही मुंबई-ठाणे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे किशोर सावळाच्या चौकशीत आर्थिक व्यवहार, बनावट कथानक आणि राजकीय हस्तक्षेपाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोव्यातून कर्नाटकातील एका देवस्थानासाठी दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटा नेल्या जात होत्या, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, नोटाबंदी झालेल्या २००० रुपयांच्या नोटांचा एवढा मोठा साठा कुठून आला, कुठे नेला जात होता? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. आता मुख्य संशयित किशोर सावळा पोलिसांना शरण आल्यानंतर ४०० कोटी रुपयांच्या नोटांची खरंच चोरी झाली होती की बनाव होता? याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.