बारमध्ये सुरु होता अश्लील डान्स, पोलिसांनी टाकली धाड; हजारोंच्या मुद्देमालासह कर्मचार्यांनाही ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा भायंदर – मीरा भाईंदरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे पोलिसांनी एका ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी काही हजारोच्या रक्कमेसह बारमधल्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. शिवाय, पोलिसांनी बार मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. नवघर पोलिसांना या ऑर्केस्ट्रा बारसंबंधित माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला. ऑर्केस्ट्रा बारचं नाव मिड लाईफ असं होतं. या बारमध्ये बेकायदेशीर रित्या काही बारबालांचा अश्लील डान्स सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.
मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर टाकलेल्या रेडमध्ये नवघर पोलिसांनी, ३०, ०४० रूपयांच्या रकमेसह बार मॅनेजर (कॅशियर), १३ वेटर्स आणि १ पुरूष म्युझिक ऑपरेटर अशा एकूण १५ जणांना आपल्या ताब्यात घेतले आहे. मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारचे चालक आणि मालक फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. परंतू पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलीस छाप्याचा कोणताही सुगावा न लागता नवघर पोलिसांनी रेड टाकल्यामुळे बारमधील सर्व कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. बार प्रशासनाकडून अनेक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.
नवघर पोलिसांनी मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर कोणत्या कारणास्तव बारवर छापा टाकला, याची माहिती दिली आहे. २६ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नवघर पोलिसांनी मीरा भाईंदर येथील मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला. यावेळी बार प्रशासनाकडून अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यामुळे हा कारवाईचा बडगा उचलला आहे. बारमध्ये काही महिलांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडले जात असल्याचे आढळून आले. वारंवार सूचना देऊनही बार व्यवस्थापनाने मुलींच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे वर्तन आणि अश्लील नृत्यास प्रोत्साहन दिल्याने ही कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाने थेट कारवाई केल्यामुळे बार प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर नवघर पोलिसांनी ठाण्यात महाराष्ट्र हॉटेल, उपगृहे आणि मद्यपान कक्ष (बाररूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध व महिलेच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियमाचे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवास गारळे हे करत आहेत.