एअर इंडियाची लँडिंग फेल; माजी उपमुख्यमंत्री अन् काँग्रेस प्रभारी थोडक्यात बचावले
योगेश पांडे / वार्ताहर
जयपुर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमधील विमान अपघातात अकाली निधन झाले. अजितदादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आहे. मुंबईहून बारामतीला निघालेल्या अजित पवारांसह ५ जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. धावपट्टीवर विमान उतरवताना विमानाचा स्फोट होऊन हा अपघात झाल्याचं समोर आलं. विमान अपघाताची ही घटना ताजी असतानाच आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला आहे. जयपुरमध्ये एअर इंडियाच्या विमानाची लँडिंग फेल झाली. या विमानात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा बसले होते. हे विमान दिल्लीतून जयपुरसाठी निघाले होते. या घटनेतून ते थोडक्यात वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे विमान एअर1719 ने जयपुर विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र उतरताच लँडिंग अयशस्वी झाले. धावपट्टीची स्थिती किंवा तांत्रिक बिघाड हे यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान विमानाचा पहिलं लँडिंग फेल होताच पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. अस्थिर दृष्टिकोनामुळे पहिला प्रयत्नात विमान उतरू शकले नाही. विमान जसं रनवेला टच झालं त्यानंतर लगेच पायलेट ने ‘गो अराउंड’ चा इशारा दिला. त्यानंतर तब्बल दहा मिनिटे हवेत घिरट्या घातल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले. विमानात असलेले सुखविंदर सिंग रंधावा सुरक्षित आहेत.
विमानतळ प्रशासनाने सांगितलेल्या माहितीनुसार, अशी परिस्थिती उड्डाण सुरक्षा मानकांमध्ये येते . या परिस्थितीत जर पायलटला कोणत्याही टप्प्यावर लँडिंग असुरक्षित वाटत असेल तर तो किंवा ती विमान पुन्हा लॉन्च करण्याचा निर्णय घेऊ शकते . या प्रक्रियेला गो अराउंड म्हणून ओळखले जाते .