दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला; देवेंद्र फडणवीस हळहळले, महाराष्ट्रात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.बुधवारी सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं राज्यात हळहळ व्यक्त होत आहे, या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. अतिशय अनाकलनीय परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुःखद निधन झाल्याची वार्ता मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली, खरं म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कालाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती, हे अतिशय संघर्षशील अशा प्रकारचे नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणार अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे. कारण अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वासनीय आहे. मनाला चटका लावणार आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे, त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत, सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. प्रधानमंत्री, गृहमंत्री सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे. त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे, एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रियाताईंची माझं बोलणं झालं. त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं. एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोहचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील. महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे, तीन दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे, पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल, पण मला असं वाटतं की कधीकधी भरून न निघणारं अशा प्रकारचं नुकसान आहे,महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी निर्माण होते ती भरून काढणं अतिशय कठीण आहे, आणि निश्चितच इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेला आहे, त्यातनं अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही, अशी भावना देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे.