भाजपाचे मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भाजपाचेमुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं शनिवारी रात्री निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुरोहित यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज पुरोहित यांची मुंबईतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये गणना होत असे. तसेच त्यांनी मुंबईत भाजपाच्या विस्तारामध्ये मोठं योगदान दिलं होतं. राज पुरोहित यांनी काही काळ भाजपाचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं होतं. तसेच १९९५ साली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपददेखील सांभाळलं होतं.
विधिमंडळातील अभ्यासपूर्ण वक्ते म्हणून ओखळ असलेले राज पुरोहित हे १९९० मध्ये मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. तेव्हापासून सलग ४ वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. पुढे २०१४ मध्ये ते कुलाबा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.
दरम्यान, राज पुरोहित यांचं पार्थिव सकाळी ११ वाजल्यापासून १ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.