ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठीबहुल ठाण्यात भोजपुरी कलाकारांकडून प्रचार

Spread the love

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठीबहुल ठाण्यात भोजपुरी कलाकारांकडून प्रचार

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – उत्तर भारतीय बहुल मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यात भोजपुरी कलाकार मैदानात उतरल्याचे दिसून आले. या कलाकारांचा ‘रोड शो’ झाला. तसेच मतदारांना साद घालण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनीही हजेरी लावली होती. वागळे इस्टेट येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपचे सुरेश कांबळे, अनिता यादव, अमित सरैया आणि शिवसेनेच्या यज्ञा भोईर रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना आणि भाजपला सोडचिठ्ठी देत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमयरित्या बहुजन समाजवादी पक्षातून रिंगणात उतरलेले महेंद्र सोडारी, केवलादेवी यादव, वर्षा पाटील आणि अपक्ष सुप्रिया सोडारी यांच्या पॅनलचे आव्हान आहे.

या प्रभागात उबाठाचे उर्मिला माने, सिता सोडारी, प्रतिक राणे आणि मनसेतून पवन पडवळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील या प्रभागामध्ये भोजपुरी अभिनेते दिनेश लाल यादव (निरहुवा) आणि भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी युतीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीला हजेरी लावली. तसेच उत्तर भारतीय मतदारांना या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन या रॅलीत करण्यात आले.

या रॅलीनंतर या कलाकारांनी इंदिरानगर चौकात आयोजित जाहीर सभेला हजेरी लावली. यावेळी भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, कृपाशंकर सिंह, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते.

दरम्यान, आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी प्रचाराची रणधुमाळी… उमेदवारांची धावपळ, असा एक महिन्यांपासून सुरू असलेला सिलसिला मंगळवारी पाच वाजता थंडावला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रभागातील अखेरच्या मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धावपळ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासून सुरु होती. उन्हातान्हात सर्वपक्षीय नेत्यांचे रोड शो, कार्यकर्त्यांच्या बाईक रॅली आणि मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीत उमेदवारांनी जीवाचे रान केले. त्यामुळे मतदारराजा गुरुवारी कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon