भिवंडीत अवैध पिस्तुलसह तरुण अटकेत; एक जिवंत काडतूस जप्त

Spread the love

भिवंडीत अवैध पिस्तुलसह तरुण अटकेत; एक जिवंत काडतूस जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणास अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

दि. १ जानेवारी २०२६ रोजी परिमंडळ क्रमांक २, भिवंडी हद्दीत गुन्हे शाखा घटक-२चे अधिकारी व अंमलदार वॉच पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई अमोल इंगळे यांना खदान रोड, शास्त्रीनगर परिसरात एका टेम्पोजवळ इसम अवैधरित्या अग्निशस्त्र घेऊन बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना कळविण्यात आली.

त्यानंतर सपोनि मिथुन भोईर व पोउनि रविंद्र बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हिंदू स्मशानभूमी जवळील मोकळ्या मैदानात सापळा रचला. पंचासमक्ष कारवाई करत अक्षय दीपककुमार वर्मा उर्फ शिवा (वय २९, रा. भिवंडी) यास ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून एक माऊझर पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळून आले.

या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७(१) व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सपोउनि सुनील साळुंके करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा घटक-२ भिवंडीच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon