आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांची दणदणीत कामगिरी

नवी मुंबई : कर्तव्यनिष्ठा, कठोर परिश्रम आणि आत्मानुशासन यांचा आदर्श घालून देणाऱ्या नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत देशाचा आणि महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. पोलीस सेवेतील जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शरीरसौष्ठव क्षेत्रातही सातत्याने सर्वोच्च कामगिरी करून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके पटकावली आहेत.
बारावीनंतर, १९९५ साली जिममध्ये पाऊल ठेवलेल्या पुजारी यांनी व्यायामाची आवड कधीच कमी होऊ दिली नाही. २००३ मध्ये पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाल्यानंतरही त्यांनी कठोर सराव आणि शिस्तबद्ध आहार कायम ठेवला. पोलीस ड्युटी पूर्ण करून दररोज किमान सहा तासांचा सराव हे त्यांचे दिनक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. महाराष्ट्र पोलीस शरीरसौष्ठव संघाचे कर्णधार म्हणून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकत भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले.
पुजारी यांच्या कामगिरीतील महत्त्वाची टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:
२०२१ मध्ये उझबेकिस्तान येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावत देशातील पहिले पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी इतिहास घडवला.
२०२२ मध्ये मालदीव येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवले. दक्षिण कोरियातील ‘मिस्टर वर्ल्ड’ स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय,
२०२५ मध्ये अमेरिकेतील बर्मिंगहॅम येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये बॉडीबिल्डिंग आणि मेन्स फिजिक या दोन्ही गटांत दोन सुवर्णपदके जिंकत त्यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला.
या स्पर्धेत ७६ देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते.
मिस्टर ऑलिंपिया विजेते सुनीत जाधव यांचे मार्गदर्शन आणि पत्नी रागिणी पुजारी यांचे मोलाचे प्रोत्साहन या यशामागे असल्याचे पुजारी यांनी सांगितले. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत हा विजय संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
कर्तव्य आणि स्वप्न यांचा समतोल साधत यश मिळवता येते, हे सुभाष पुजारी यांच्या यशोगाथेने अधोरेखित झाले आहे. पोलीस दलातील तरुणांसाठी ते आज खऱ्या अर्थाने रोल मॉडेल ठरत असून, त्यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे.