कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात; बावधनमधून लढणार निवडणूक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे महापालिकेची निवडणूक यंदा तिरंगी होणार असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. अशातच आता आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी एबी फॉर्मचं वाटप सुरू असून अजितदादांच्या भेटीसाठी जिजाऊ निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. रुपाली ठोंबरे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक नेते देखील जिजाऊवर अजित पवारांच्या भेटीसाठी आले. अशातच आता अजितदादा गटाने कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महापालिकेसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली. त्या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीला टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जयश्री मारणेला अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधनमधून एबी फॉर्म देण्यात आलाय. गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने मोठा राडा होण्याची शक्यता आहे. ८ दिवसांपूर्वी जयश्री मारणे अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॅास्टेलला पोहोचल्या होत्या.
गजा मारणेची पत्नी माजी नगरसेविका राहिल्या आहेत. जयश्री यांनी २०१२ साली पुण्यामध्ये कोथरुडमधून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यावेळेस त्या मनसेच्य़ा तिकिटावर निवडूनही आल्या होत्या. आता २०२२ मध्ये जयश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता त्या अजित पवार गटाकडून अधिकृतरित्या उमेदवार आहेत. जयश्री मारणे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर उमेदवारी दिली जाईल, याची चर्चा होती.
दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील लोकांची राजकारणाकडे वाटचाल सुरू असल्याचं पहायला मिळालं होतं. लंडनला पळून गेलेला निलेश घायवळचा भाऊ देखील निवडणुकीत उभा राहणार होता. तसेच बंदू आंदेकर टोळीतील तिघांनी निवडणुकीत उभं राहण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. अशातच आता तिसरी टोळी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.