पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; डोक्यात फरशीने वार करत एकाची हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. विशाल कांबळे असे मृत पावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात फरशीचे वार करून त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात एका आरोपीला मारहाण झाली होती. बराक क्रमांक १ मध्ये विशाल कांबळे याचे इतर आरोपींशी काही कारणावरून वाद झाले. त्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.विशाल कांबळे याच्या डोक्यावर आणि कंबरेवर फरशीने वार करण्यात आले होते. आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
विशाल कांबळे याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. यानिमित्ताने येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.