सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करून उत्पादन; मुंबईतून दोघांसह ५ उच्चशिक्षित तरुण ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत हिंजवडी फेज-एकमध्ये एका सोसायटीतील सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करून उत्पादन घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार खडकी पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणात पाच उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली असून अमली पदार्थ तस्करीची साखळी उलगडताना पुण्यासह पिंपरी, मुंबई आणि गोवा येथे कारवाई करीत सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
तुषार चेतन वर्मा (२१), सुमीत संतोष डेडवाल (२५), अक्षय सुखलाल महेर (२५), मलय राजेश डेलीवाला (२८) आणि स्वराज अनंत भोसले (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील वर्मा हा नामांकित खासगी महाविद्यालयातून एमबीएचे शिक्षण घेत आहे. स्वराज भोसलेने अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे. डेडवाल आणि महेर यांचे एमबीएचे शिक्षण झालेले आहे.
आरोपी तुषार वर्मा अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खडकी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत वर्माने सुमीत डेडवाल आणि अक्षय महेर यांच्यासह पिंपरीतील सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पिंपरीत छापा टाकला. हिंजवडी येथे एका भाडेतत्त्वावरील सदनिकेत डेडवाल आणि महेर राहत होते. तेथे अत्याधुनिक पद्धतीने हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्यात येत असल्याची माहिती छाप्यादरम्यान उघड झाली. पोलिसांनी हायड्रोपोनिक गांजा तसेच लागवडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या कारवाईनंतर मिळालेल्या माहितीनुसार पुणे, पिंपरीसह मुंबई आणि गोव्यातही छापे टाकण्यात आले. या कारवाईत मेफेड्रोन, ओझीकुश (हायड्रोपोनिक गांजा), चरस, एलएसडी स्टॅम्पसह विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.