मोक्का गुन्ह्यातील पाहिजे ईराणी आरोपी जेरबंद; ठाणे–मुंब्रासह पाच शहरांतील २० चेन स्नॅचिंग उघड
पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाणे शहरात वाढत्या जबरी चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ठाणे गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मोक्का गुन्ह्यात पाहिजे असलेल्या ईराणी आरोपीस कर्नाटकातील बिदर येथून अटक करत गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडी, मुंब्रा, ठाणे, उल्हासनगर व अंबरनाथ परिसरातील तब्बल २० चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हे शाखा घटक–२, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील व पथक नारपोली पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १०२७/२०२५ चा समांतर तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे अब्बास ऊर्फ बड्डा युनूस सय्यद (वय २१, रा. आंबिवली, ता. कल्याण) याचा माग काढण्यात आला. त्यानुसार त्याला कर्नाटकातील बिदर येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीने साथीदारासह विविध शहरांमध्ये चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण २३२.५ ग्रॅम वजनाचे, सुमारे ३० लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध यापूर्वीही खडकपाडा पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत मुंब्रा, वर्तकनगर, कापूरबावडी, चितळसर आदी पोलीस ठाण्यांतील एकूण २० गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही धडक कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक–२, भिवंडीच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी पार पाडली.