उलवे पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध पेट्रोल विक्रीचा सुळसुळाट, भेसळयुक्त पेट्रोल खुलेआम; पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह
पोलीस महानगर नेटवर्क
उलवे (पनवेल) : पनवेल तालुक्यातील उलवे वसाहतीत अनधिकृत व भेसळयुक्त पेट्रोलची खुलेआम विक्री सुरू असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उलव्यात अधिकृत पेट्रोल पंप नसल्याने वाहनचालकांना बेलापूर किंवा जासईपर्यंत जावे लागते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रत्येक सेक्टरमध्ये नाक्यानाक्यावर बाटल्यांमधून पेट्रोलची बिनधास्त विक्री होत असल्याचे चित्र आहे.
एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल १३० रुपये आकारले जात असून, नागरिकांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. भेसळयुक्त पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असतानाही पर्याय नसल्याने नागरिक ते खरेदी करण्यास भाग पडत आहेत. विशेष म्हणजे, या अवैध विक्रेत्यांना पोलिस कारवाईची भीती उरलेली नसल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येत आहे.
उलव्यात सध्या आठ ते दहा बेकायदा पेट्रोल विक्रेते कार्यरत असून, प्रत्येक विक्रेत्याकडून दररोज सुमारे १०० ते १२५ लिटर पेट्रोल विकले जात असल्याची माहिती आहे. म्हणजेच दररोज १,००० ते १,२५० लिटर पेट्रोलचा अवैध व्यवहार होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल कोणत्या अधिकृत पंपातून पुरवले जाते, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
इतक्या प्रमाणातील पेट्रोल साठा अत्यंत धोकादायक असून, आगीसारख्या गंभीर दुर्घटनांना निमंत्रण देणारा आहे. जावळे गावात गेल्या वर्षी किराणा दुकानातून होणाऱ्या अनधिकृत पेट्रोल विक्रीमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते आणि कुटुंबालाही जीव गमवावा लागला होता. त्या घटनेनंतर तत्कालीन आदेशानुसार नवी मुंबईत अवैध पेट्रोल विक्रीचे अड्डे बंद करण्यात आले होते.
मात्र, उलवे परिसरात हे अड्डे पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या उज्ज्वल प्रतिमेला मलीन करणारे हे प्रकार थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, उलवे पोलिस ठाणे हद्दीतील सर्व अवैध व भेसळयुक्त पेट्रोल विक्रीवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.