पुणे-पिंपरी चिंचवडला मिळणार ७ नवीन पोलीस स्टेशन्स; तर ३ नवीन झोन मंजूर
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरांमध्ये झपाट्याने होणारे नागरिकरण आणि वाढत्या गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पुणे शहर पोलीस दलासाठी पाच नवीन पोलीस स्टेशन्स आणि दोन नवे प्रशासकीय झोन तसेच पिंपरी चिंचवड पोलीस दलासाठी दोन नवीन पोलीस स्टेशन्स आणि एक नवीन झोन स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नऱ्हे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, मांजरी आणि लोहेगाव येथे पाच नवीन पोलीस स्टेशन्स स्थापन करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे सायबर पोलीस ठाण्यासह पुणे शहरात एकूण पोलीस स्टेशन्सची संख्या ४५ झाली आहे.
यासह झोन सहा आणि झोन सात असे दोन नवीन झोन तयार झाले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन नवीन झोनसाठी दोन अतिरिक्त पोलीस उपायुक्त मिळतील. तसेच, नवीन पोलीस स्टेशन्ससाठी सुमारे ८५० नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल.
पोलीस ठाण्यांचे विभाजन –
नऱ्हे – सिंहगड रोड पोलीस ठाण्यातून विभागून, लक्ष्मीनगर – येरवडा पोलीस ठाण्यातून विभागून, मांजरी – हडपसर पोलीस ठाण्यातून विभागून, लोहेगाव – विमानतळ पोलीस ठाण्यातून विभागून, येवलेवाडी – कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांमधून विभागून
नवीन झोनची रचना – झोन ६- हडपसर, काळेपडळ, मुंढवा, फुरसुंगी, मांजरी, लोणीकाळभोर,
झोन ७- लोणीकंद, वाघोली, लोहेगाव, विमानतळ, खराडी, चंदननगर
पुण्यासोबतच राज्य सरकारने पिंपरी चिंचवड पोलीस दलासाठीही दोन नवीन पोलीस स्टेशन्स आणि एक नवीन झोन स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एमआयडीसी मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चाकणमध्ये दोन नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी चाकण दक्षिण हे आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांमधून तर उत्तर महाळुंगे हे महाळुंगे एमआयडीसी मधून विभागून तयार केले जाईल.सरकारने पिंपरी चिंचवडसाठी तीन नवीन पोलीस उपायुक्त आणि सहा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या पदांनाही मंजुरी दिली आहे. सायबर पोलीस ठाण्यासह येथे आता एकूण पोलीस ठाण्यांची संख्या २५ झाली आहे.