१७ वर्षांपासून फरार खुनाचा आरोपी अखेर गजाआड

Spread the love

१७ वर्षांपासून फरार खुनाचा आरोपी अखेर गजाआड

सुधाकर नाडार/ मुंबई

मुंबई : मुलुंड पोलीस ठाणे हद्दीतील २००८ सालच्या खुनाच्या प्रकरणातील तब्बल १७ वर्षांपासून फरार असलेला पाहिजे आरोपी गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष–४ यांनी शिताफीने अटक केला आहे. मादक पदार्थांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून घडलेल्या या खुनाचा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

१ ऑक्टोबर २००८ रोजी डांगरपाडा, पाईपलाईन, मुलुंड कॉलनी (पश्चिम) येथे राजेश सोनी लखवाणी (वय ३१) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ३४१/२००८ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३४, १२०(ब) तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील दोन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र दुर्गेश उर्फ छोटू अवदेश गौडा हा मुख्य आरोपी १७ वर्षांपासून फरार होता. आरोपीच्या हालचालींबाबत मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष–४ च्या पथकाने रावळी कॅम्प, अँटॉपहिल परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सखोल चौकशीनंतर आरोपीचा खुनाच्या गुन्ह्यात थेट सहभाग निष्पन्न झाल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला मुलुंड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राजतिलक रौशन आणि सहायक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या यशस्वी मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, सहायक पोलीस फौजदार अरुण उघाडे, पोलीस हवालदार प्रमोद मोरे, पोलीस शिपाई अनिल पवार यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष–४ च्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon