पुण्यातील डोळस दाम्पत्यांची १४ कोटींची फसवणूक; आरोपी वेदिका पंढरपुरकरकडून पैसे परत देण्याची तयारी
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यातील आयटी अभियंता दीपक डोळस आणि त्यांच्या कुटुंबाची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक करणारी मांत्रिक वेदिका पंढरपुरकर हिने अखेर लुबाडलेली रक्कम परत देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात वेदिकाच्या वकिलांकडून आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या गाजलेल्या फसवणूक प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
शंकर महाराज अंगात येतात, तुमच्या मुलींचे आजार बरे होतील, असा दावा करून भोंदू बाबाने आणि त्याच्या शिष्येने डोळस दाम्पत्याला तब्बल सहा वर्षे मानसिक गुलामगिरीत अडकवून कोट्यवधींची संपत्ती लुबाडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या प्रकरणात वेदिका पंढरपुरकर, तिचा पती कुणाल पंढरपुरकर व तिचा गुरु दीपक खडके यांना अटक करण्यात आली असून त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने वेळोवेळी फेटाळले आहेत.
*२०१८ पासून सुरू होता फसवणुकीचा प्रकार*
२०१८ पासून दीपक डोळस, त्यांची पत्नी आणि दोन मुलींना दीपक खडकेच्या दरबारात नेण्यात येत होते. त्या ठिकाणी वेदिका पंढरपुरकर हिच्या अंगात ‘शंकर महाराज येतात’ अशी अभिनय करत असल्याचा दावा करण्यात येत होता. तुमच्या घरात व संपत्तीत दोष असल्यामुळे मुलींचे आजार बरे होत नाहीत, असे सांगत डोळस दाम्पत्याला त्यांच्या सर्व बँक ठेवी, गुंतवणूक आणि मालमत्ता विकण्यास भाग पाडण्यात आले.
*इंग्लंडमधील घर व फार्महाऊसचीही विक्री*
डोळस हे काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत असल्याने त्यांचे तेथे घर आणि फार्महाऊस होते. ही संपत्ती देखील दोष असल्याचे सांगून विक्रीस काढण्यात आली. त्या रकमेचे तसेच पुण्यातील प्लॉट, फ्लॅट विक्रीचे पैसे आरटीजीएसद्वारे थेट वेदिका पंढरपुरकर आणि दीपक खडके यांच्या खात्यात वळते करण्यात आले. यातून एकूण सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
*पैसे परत देण्याची कबुली*
या प्रकरणात आता आरोपी वेदिका पंढरपुरकर हिने लुबाडलेली रक्कम परत देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात आज न्यायालयात अधिकृत प्रतिज्ञापत्र सादर होणार असून, त्यानंतर न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे भोंदू बाबांच्या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकून सामान्य नागरिक कसे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतात, याचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.