राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचाही मृत्यू; दोन वाघांच्या मृत्यूची माहिती लपवल्याने व्याघ्रप्रेमिंचा संताप
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्राणीसंग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, शक्ती वाघाच्या मृत्यू आधी काही दिवस रुद्रचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शक्ती आणि करिष्मा यांचा रुद्र हा बछडा होता. राणीच्या बागेतच त्याचा जन्म झाला. तीन वर्षाच्या रुद्र वाघाचा इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, मात्र मृत्यूचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र वाघाच्या मृत्यूनंतर शक्ती वाघाचा मृत्यू झाला. मात्र या दोन्ही वाघांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला नसल्याने आणि कारण समोर न आल्याने यासंबंधी माहिती जिजामाता उद्यानातील प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. दोन वाघांच्या मृत्यूची माहिती का दडवली गेली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी याबाबत सवाल उपस्थित केला आहे. रूद्र वाघाबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर रुद्र वाघाबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. सात दिवसांत भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
भायखळा येथील प्राणी संग्रहालयातील शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राणी संग्रहालयात प्रशासन आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसिद्ध न करणे या मागचं नेमकं कारण काय आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. श्वसन नलिकेच्या जवळ हाड अडकून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र त्याच्यावर उपचार का केले नाही? असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.