थकीत वेतनासाठी प्रमुख लिपिकाची लाच मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, रंगेहाथ अटक

Spread the love

थकीत वेतनासाठी प्रमुख लिपिकाची लाच मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, रंगेहाथ अटक

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : इंदापूरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रमुख लिपिकाने स्वतःच्या संस्थेतील वसतीगृह अधीक्षकाकडे थकीत वेतन काढून देण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या प्रमुख लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

अनमोल शिवाजी शिंगे (वय ५३, रा. तापी गृहनिर्माण संस्था, राजवेलीनगर, इंदापूर) असे अटक झालेल्या लिपिकाचे नाव आहे. शिंगे हे मालोजीराजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रमुख लिपिक म्हणून कार्यरत आहेत, तर तक्रारदार त्याच संस्थेत वसतीगृह अधीक्षक आहेत.

तक्रारदाराचे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ या तीन महिन्यांचे वेतन थकित होते. हे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात शिंगे यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितली व लाच न दिल्यास कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण करण्याची धमकी दिली, अशी तक्रार १९ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

त्या अनुषंगाने त्याच दिवशी पडताळणी करण्यात आली असता, शिंगे यांनी पुढील सहकार्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २ हजार रुपये स्विकारताना शिंगे यांना पथकाने रंगेहाथ पकडले.

अटकेनंतर अनमोल शिंगे यांच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon