डोंबिवलीत ज्वेलर्सला ओलीस ठेवत लाखोंची लूट; तिघे आरोपी फरार, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : शहराला हादरवून सोडणारी घटना डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव येथे उघडकीस आली आहे. वराही ज्वेलर्सचे मालक नारायणलाल रावल यांना घरात बोलावून बेदम मारहाण, ओलीस ठेवून लाखोंच्या दागिन्यांची आणि रोकड रकमेची लूट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २० नोव्हेंबर रोजी जय मल्हार इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरला ६०-६५ वर्षे वयोगटातील वैशाली जाधव नावाच्या महिलेने रावल यांच्या दुकानात सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली होती. अॅडव्हान्स रकमेबाबत विचारणा केल्यावर तिने मुलांकडून पैसे दिले जातील असे सांगत रावल यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून अॅडव्हान्स देण्यासाठी विशिष्ट पत्त्यावर येण्यास सांगितले.
रावल हे दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यावर, त्या घरात महिलेची मुले असल्याचे भासवणारे दोन अनोळखी पुरुष उपस्थित होते. ‘आई थेरपीसाठी गेली आहे’ असे सांगून त्यांनी रावल यांना घरात बोलावले. क्षणातच घराचा दरवाजा बंद करून, टीव्हीचा आवाज वाढवून दोघांनी रावल यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना दोरीने बांधून ठेवण्यात आले. आरोपींनी रावल यांच्याकडील ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लुटली आणि लगेच पसार झाले.
आरोपी पळून गेल्यानंतर रावल यांनी कसाबसा स्वतःची सुटका करून थेट मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात पुरुष आणि संबंधित महिलेविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली असून तपास वेगाने सुरू असल्याचे मानपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्येही चिंतेची भावना पसरली आहे.