मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ; एक रूपयाचीही भाडेवाढ न करता सर्वलोकल ट्रेन वातानूकुलित करणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लटकत धक्के खात मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करावा लागतो. खरा मुंबईकरच लोकल ट्रेनने प्रवास करू शकतो, बाहेरच्या व्यक्तीला लोकलमध्ये शिरताही येणार नाही असे म्हणतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात लोकल ट्रेन सेवेत मोठे बदल होतील असे सूतोवाच केले आहे. एक रुपयाचीही भाडेवाढ न करता मुंबईकरांना मेट्रोप्रमाणेच लोकलनेही आरामदायक आणि एसीतून प्रवास करता येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात मुंबईमध्ये काय बदल होतील यावर प्रकाशझोत टाकला.
देवेंद्र फडणवीस यांची युथ कनेक्ट कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “उपनगरीय लोकल ट्रेन ही मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेनने अंदाजे ९० लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो सेवा चांगली दिली मात्र आजही लोकल ट्रेनने प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागतो. लोकल सेवेत आम्ही आमूलाग्र बदल करतो आहोत. आम्ही सगळे कोचेस मेट्रोसारखे एसी करत आहोत आणि त्यांचे दरवाजे बंद होणारे असतील. इतकी सुंदर सेवा देत असताना सेकंड क्लासचं भाडं मात्र वाढवले जाणार नाही.”
२०३२ पर्यंत मुंबईत सुरू असलेले सगळे विकास प्रकल्प पूर्ण होतील असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून नव्या रस्त्यांचे जाळे उभारले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यामध्ये काही बोगदेही तयार करण्यात येत असून मुंबई शहरात न येता एखाद्या व्यक्तीला नवी मुंबई किंवा वसई-विरारपर्यंत कसे पोहोचता येईल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या विकास कामांअंतर्गत खोदण्यात येत असलेल्या बोगद्यांच्या जाळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाताल लोक’ म्हणत याबद्दलची सविस्तर माहिती दिली. गर्दीच्या वेळी म्हणदेत पीक अवरला मुंबई शहरात गाड्यांचा वेग हा २० किलोमीटर प्रति तास इतका असतो, कधी कधी तो १५ पर्यंत खाली येतो. सगळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा वेग ८० किलोमीटर प्रति तासापर्यंत जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.