ठाण्यात महावितरणची मोठी कारवाई; ‘द रेकाडी’ हॉटेलमध्ये ४२ लाखांची वीज चोरी उघड
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : महावितरणच्या भरारी पथकाने कोळशेत परिसरातील ‘द रेकाडी’ हॉटेलमध्ये धडक तपासणी करत तब्बल ४२ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. मीटरमध्ये रिमोट सर्किट बसवून छेडछाड केल्याचे तपासात समोर आले असून, ही चोरी एक वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
महावितरणला मीटर डेटामध्ये अनियमितता आढळल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. ११ नोव्हेंबर रोजी सहाय्यक अभियंता विठ्ठल माने, फोरमन किरण दंडवते आणि मुख्य तंत्रज्ञ राजेंद्र बाणे यांनी हॉटेलमध्ये तपासणी केली. त्यावेळी मीटरची सील तुटलेली असून मीटर पल्सेस नोंदवले जात नसल्याचे समोर आले. पुढील तांत्रिक तपासणीत रिमोटने नियंत्रित होणारे सर्किट बसवून कमी वीज वापर दाखवला जात असल्याचे स्पष्ट झाले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलकडून चौकशी केल्यानंतर चोरीची कबुली मिळाली. मागील २४ महिन्यांत ४१,६६,७१० युनिट्स वीज चोरी झाल्याचे महावितरणने सांगितले आहे.
या गंभीर गुन्ह्याबाबत कोपरी पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल मालक शिवराम शेट्टी आणि शैलेश देधिया यांच्याविरुद्ध वीज अधिनियम २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज चोरी हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होतो. अशा अवैध प्रकारांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.