महिला सुरक्षा, ड्रग्स-मुक्त शहर व सायबर सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांचा सर्वांगीण उपक्रम; सहा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची प्रभावी प्रेझेंटेशन्स
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुणे पोलिसांच्या वतीने काल एक सर्वसमावेशक जनजागृती सेमिनार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे निमंत्रण पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त श्री हिम्मत जाधव यांनी दिले होते. महिला सुरक्षा, ड्रग्स-फ्री पुणे, सायबर सुरक्षितता, कॉलेज कॅम्पस सुरक्षा, सोशल मीडिया व मानसिक आरोग्य तसेच वाहतूक सुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक व सर्वंकष उपाययोजना कशा करता येतील या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात संबंधित क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले, तसेच सहा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्वरूपातील प्रेझेंटेशन्स सादर केली. विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण विचार आणि उपयुक्त उपाययोजना निश्चितच पुणे शहराला या संवेदनशील समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी नवे दिशादर्शन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या संकल्पनेमागे माननीय पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार आयपीएस यांची दूरदृष्टी होती. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पुणेकर म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण दिल्याबद्दल डीसीपी हिम्मत जाधव यांचेही मनापासून आभार.
पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून आखलेला हा उपक्रम आगामी काळात शहर अधिक सुरक्षित, सशक्त आणि जबाबदार बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.