अंबानीकडे नोकरीचे आमिष; तळोज्यात कुटुंबाची पावणेचार लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पनवेल – प्रतिष्ठित उद्योगसमूहात चालकाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तळोजा परिसरातील एका कुटुंबाची तब्बल ₹४ लाख ८७ हजार ८७५ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिनेश आणि कविता कदम या दाम्पत्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात सोमवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, तळोजा फेज २ येथील आनंदसागर सोसायटीमध्ये राहणाऱ्या पीडित कुटुंबाची ओळख जून महिन्यात कदम दाम्पत्याशी झाली होती. काही महिन्यांतच त्यांचा विश्वास संपादन करत आरोपींनी “अंबानीकडे चालकाची नोकरी लावून देतो” असे सांगत सुरुवातीला ₹६० हजार रुपये घेतले. त्यानंतर पीडित कुटुंबातील सदस्यांची आधार, पॅन आदी कागदपत्रे घेतली.
ही कागदपत्रे वापरून आरोपींनी बेलापूर आणि वाशी येथील विविध दुकानदारांकडून मोबाईल, एसी, टीव्ही अशा वस्तू हप्त्यावर त्यांच्या नावाने खरेदी केल्या. यासोबतच पीडितांकडील सोन्याचे दागिने सराफाकडे गहाण ठेवून रोख रक्कम उचलल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
एकूण फसवणूक रक्कम ₹४.८७ लाखांपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुहाडे करीत आहेत. कदम दाम्पत्याची प्रत्यक्षात अंबानी उद्योगसमूहातील कोणाशी ओळख आहे की ही केवळ फसवणुकीची बतावणी होती, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.