मुलुंड पोलिसांची मोठी कारवाई; बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; ५ जणांना अटक
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – मुलुंड पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत अमेरिकन व कॅनेडियन नागरिकांना फसवणूक करणाऱ्या बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, लॅपटॉप, मोबाईल फोन, राउटर आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुलुंड कॉलनी परिसरातील एका ठिकाणी काही व्यक्ती अमेरिकेतील बँक अधिकाऱ्यांची बनावट ओळख सांगून नागरिकांना “Pay Day Loan” देण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचे समजले.
त्यानंतर मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-७) राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात सागर गुप्ता याच्यासह चार साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.
तपासात उघड झाले की, आरोपी “Lending Point” या अमेरिकन वित्तसंस्थेचे अधिकारी असल्याचे भासवून आंतरराष्ट्रीय ई-सिम कार्डच्या माध्यमातून अमेरिकन व कॅनेडियन नागरिकांशी संपर्क साधत होते. कर्ज मंजुरीचे बनावट दस्तऐवज दाखवून “प्रोसेसिंग फी” च्या नावाखाली ते $90, $100, $150 इतक्या रकमा उकळत होते.
छाप्यात पोलिसांनी
🔹 २ लॅपटॉप
🔹 ११ मोबाईल फोन
🔹 २ राउटर
🔹 ₹७६,०००/- रोख रक्कम
असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपी कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय अमेरिकन फायनान्स कंपनीच्या नावाखाली बनावट ओळख वापरून संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात सीसीटिएनएस गु.र.नं. १०३२/२०२५ नोंदविण्यात आला असून, भा.दं.वि. कलम ६१(२), ३१६(२), ३१८(२), ३३८, ३४०(२), ३१९(२), ३३६(३) तसेच आयटी अॅक्टच्या कलम ६६(C), ६६(D) आणि Telecommunication Act च्या कलम ३(१), ४२(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, मा. सह-आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-७) राकेश ओला, आणि सहायक पोलीस आयुक्त (मुलुंड विभाग) संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शिवाजी चव्हाण, स.पो.नि. सुनिल करांडे, स.पो.नि. मनोज पाटील, पो.उ.नि. शिवानंद आपुणे, तसेच पोलीस हवालदार उरणकर, पो.शि. आव्हाड, विंचू, कट्टे, ढेबे, बनसोडे आणि पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुलुंड पोलिसांची ही कारवाई परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरुद्धची एक महत्त्वाची आणि प्रशंसनीय मोहीम ठरली आहे.