दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रातील शिक्षक इब्राहिम आबिदी ताब्यात

Spread the love

दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रातील शिक्षक इब्राहिम आबिदी ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – राजधानी दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला असताना, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे धडक कारवाई करत एका शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव इब्राहिम आबिदी असे असून, सध्या त्याची एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा कौसा परिसरातील भाड्याच्या घरात राहणाऱ्या इब्राहिम आबिदीच्या घरी एटीएसने मंगळवारी सकाळी छापेमारी केली. आबिदी हा शिक्षक असून तो दर रविवारी कुर्ला येथील एका मशिदीत उर्दू शिकवण्यासाठी जात असे. त्याची दुसरी पत्नी कुर्ल्यात राहत असून, तिच्या घरावरही एटीएसकडून एकाच वेळी छापा टाकण्यात आला आहे.

एटीएसला संशय आहे की इब्राहिम आबिदी विद्यार्थ्यांना धार्मिक अतिरेकी विचारांकडे प्रवृत्त करत होता आणि काही संवेदनशील गटांशी त्याचे संपर्क असावेत. पोलिसांनी त्याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दस्तऐवज जप्त केले असून त्यांचे तांत्रिक विश्लेषण (फॉरेन्सिक ॲनालिसिस) करण्यात येणार आहे.

ही कारवाई दिल्लीतील स्फोट प्रकरणाशी संबंधित तपासाचा भाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या स्फोटात काही डॉक्टरांची नावे समोर आली असून, उमर नावाच्या संशयितासह काहींना अटकही करण्यात आली आहे.

यापूर्वीही पुण्यातील अल-कायदा इन इंडियन सबकाँटिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ प्रचार करणाऱ्या जुबेर इलियास हंगरगेकर या सॉफ्टवेअर इंजिनिअरला एटीएसने अटक केली होती. त्याच तपासाच्या धाग्यावरूनच मुंब्रा येथील शिक्षक इब्राहिम आबिदीवर एटीएसची कारवाई झाल्याची माहिती आहे.

सध्या एटीएसकडून आबिदीची सखोल चौकशी सुरू असून, त्याचे दिल्ली स्फोटाशी किंवा AQIS नेटवर्कशी संबंध होते का, हे तपासले जात आहे. या कारवाईमुळे ठाणे आणि मुंब्रा परिसरात तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एटीएसच्या गुप्त तपासाने दहशतवादी संघटनांच्या महाराष्ट्रातील हालचालींवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon