मंत्री आशिष शेलारांच्या शेजारील इमारतीत मतदारयादीत झोल!; मनसेचा धक्कादायक आरोप

Spread the love

मंत्री आशिष शेलारांच्या शेजारील इमारतीत मतदारयादीत झोल!; मनसेचा धक्कादायक आरोप

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात, म्हणजेच राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघातच मतदारयादीतील गंभीर गोंधळ उघड झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात काही धक्कादायक खुलासे केले.

“आशिष शेलार दुसऱ्यांच्या मतदारसंघात डोकावतात, पण स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या मतदारसंघातच मतदारयादीत मोठे घोटाळे सुरू आहेत. त्याची तक्रार आम्ही रिटर्निंग ऑफिसरकडे देणार आहोत,” असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, “शेलार यांच्या घराशेजारील ‘सारंग तरंग’ बिल्डिंगमध्ये १ ते २८ फ्लॅट आहेत. पण त्या इमारतीच्या मतदारयादीत ‘घर क्रमांक ४५५’ असा दाखला देऊन दोन नावे आढळली आहेत. समुद्री बासू कलको आणि बासू कलको. मात्र त्या इमारतीत असा कोणताही फ्लॅट अस्तित्वात नाही. सोसायटीच्या सचिवांनीदेखील या नावाच्या व्यक्ती कधीच तिथे राहत नसल्याचे सांगितले आहे.”

याचप्रमाणे, ‘किनारा बिल्डिंग’मध्येही गोंधळ आढळल्याचे देशपांडे यांनी सांगितले. “या इमारतीत १ ते १४ फ्लॅट आहेत, पण मतदारयादीत फहद गुलाम मोहम्मद पठाण या व्यक्तीचे नाव घर क्रमांक ७७ म्हणून नोंदवले आहे. ७७ क्रमांक कुठून आला? अशी नोंदणी कशी झाली? शेलार साहेब या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत का?” असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला.

मनसेच्या या आरोपांमुळे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील मतदारयादीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon