पुण्यातील माजी नगरसेविका प्राची आल्हाट यांच्यासह पतीवर गुन्हा दाखल; डॉक्टरांची २४ लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : ‘ॲमेनिटी स्पेस’ म्हणजेच सार्वजनिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून हडपसर परिसरातील महंमदवाडी येथील एका डॉक्टरांची तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेविकेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी माजी नगरसेविका प्राची आल्हाट, त्यांचे पती अशिष आल्हाट, चिंतामणी कुरणे (रा. महंमदवाडी) आणि आसिफ शेख (रा. मंगळवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद डाॅ. महेंद्र धोंडीराम सुरवसे (वय ३९, रा. महंमदवाडी) यांनी दिली असून हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टरांचे महंमदवाडी परिसरात स्वतःचे रुग्णालय आहे. आरोपींनी डॉक्टरांचा विश्वास संपादन करत ‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देण्याचे आणि पुणे महानगरपालिकेकडून आवश्यक परवानग्या मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी डॉक्टरांकडे २५ लाख रुपयांची मागणी केली.
आरोपींच्या आश्वासनावर विश्वास ठेवून डॉक्टरांनी आपल्या पत्नीच्या आणि मित्राच्या बँक खात्यांमधून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये आरोपींच्या खात्यात वर्ग केले. मात्र, ठरलेली जागा मिळवून न देता आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले.
या प्रकरणी डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्ह्याचा पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.