लग्नाचे आमिष दाखवून कामोठे येथील महिलेची १६ लाखांची फसवणूक; गुन्ह्याचा तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याकडे वर्ग
पोलीस महानगर नेटवर्क
पनवेल : लग्नाचे आमिष दाखवून कामोठे येथील ४० वर्षीय महिलेची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे सेक्टर १९ मध्ये राहणाऱ्या पीडित महिलेनं २०१८ साली एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर आपली वैयक्तिक माहिती नोंदवली होती. त्याच वेबसाइटवरून तिची ओळख नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी गावचा रहिवासी निलेश निफाडे पाटील (वय ४०) याच्याशी झाली.
निलेशनं स्वतःला व्यावसायिक असल्याचं सांगत पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचं आश्वासन देत जून २०१८ ते जून २०२२ या कालावधीत त्यांची पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अनेक वेळा भेट झाली. या भेटींच्या काळात निलेशनं “व्यवसायासाठी पैसे लागतील” या कारणावरून वेगवेगळ्या वेळेस एकूण १६ लाख रुपये घेतले.
परंतु, पीडितेकडून घेतलेले पैसे परत देण्यास तो वारंवार टाळाटाळ करू लागला. “आज देतो, उद्या देतो” अशा कारणांनी तो पैसे देण्यास नकार देत राहिला. अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पीडित महिलेला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिनं पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे यांनी गुन्हा नोंदवला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका खरटमल करत आहेत. प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची सुरूवात पुणे रेल्वे स्टेशन परिसरात झाल्याचं निष्पन्न झाल्यानं हा गुन्हा पुढील तपासासाठी पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली.