कल्याण स्टेशनवरील पुलावरून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी; अवघ्या ६ तासांत आरोपींना बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झोपलेल्या मजुराच्या कुटुंबातील ८ महिन्यांच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, कल्याण रेल्वे पोलिस आणि महात्मा फुले पोलिसांनी अवघ्या सहा तासांत बाळाची सुखरूप सुटका करून दोन आरोपींना अटक केली.
पुण्याहून आलेले नीलेश कुंचे व पत्नी पूनम पोंगरे हे तीन मुलांसह पुलावर झोपले असताना, पहाटे एका तरुणाने झोपेतून बाळ उचलून नेले. सकाळी बाळ गायब असल्याचे लक्षात येताच पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही तपासात अक्षय खरे हा तरुण बाळ घेऊन जाताना आढळला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला सिंडीकेट परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याची आत्या सविता खरेही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघड झाले. दोघांनाही अटक करण्यात आली असून बाळ सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशीत बाळ विक्रीचा उद्देश असल्याचा पोलिसांचा संशय असून पुढील तपास सुरू आहे.