चेंबूरच्या छेड़ानगरमध्ये बेकायदा लॉजिंगचा सुळसुळाट; वेश्यावृत्तीच्या धंद्याला ऊत
रवि निषाद / मुंबई
मुंबई – चेंबूर (टिळक नगर) पोलिसांच्या हद्दीत असलेला छेड़ानगर परिसर दिवसेंदिवस ‘लॉज नगरी’ म्हणून कुप्रसिद्ध होत आहे. या भागात तब्बल २० हून अधिक लॉजिंग-बोर्डिंग सुरू असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणी अनैतिक संबंध आणि वेश्यावृत्तीचा धंदा उघडपणे सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनीही पोलिस आणि मनपा प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या परिसरातील अनेक लॉज संचालकांकडून ग्राहकांना कॉल गर्ल्स पुरवण्याचा व्यवसाय खुलेआम चालवला जात आहे. काही ठिकाणी कॉलेज आणि शालेय वयोगटातील मुलींचाही सहभाग असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
यातील अधिक गंभीर बाब म्हणजे बहुतेक लॉजकडे ना हेल्थ लायसन्स आहे, ना फायर लायसन्स. तरीही हे सर्व व्यवसाय चेंबूर मनपा आणि टिळक नगर पोलिसांच्या आडून सुरु असल्याचे आरोप होत आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, जे नागरिक या अनैतिक धंद्यांविरोधात तक्रार करतात, त्यांची ओळख पोलिस किंवा मनपाचे काही अधिकारी लॉज मालकांना उघड करतात, ज्यामुळे तक्रारदारांचा जीव धोक्यात येतो.
असा आरोप आहे की, टिळक नगर पोलिसांनी एका तक्रारदाराचं नाव हॉटेल ‘गॅलेक्सी शूट’च्या मालकाला सांगितल्याने त्या व्यक्तीवर जीवघेणा प्रसंग ओढवला.
सूत्रांनुसार, छेड़ानगरमध्ये केवळ ‘संगम’ आणि ‘श्लोक’ या दोन लॉजिंगकडेच आवश्यक परवाने आहेत, तर उर्वरित सर्व लॉज बिनधास्तपणे अवैध पद्धतीने सुरू आहेत. तसेच, पोलिस विभागातील काही अधिकाऱ्यांकडून दरमहा लॉज मालकांकडून ‘वसुली’ केली जाते, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या वाढत्या अनैतिक कारवायांमुळे परिसरातील दक्ष नागरिक, प्रबुद्ध व्यक्ती आणि समाजसेवकांनी संबंधित सर्व लॉजिंगवर तातडीने पोलिस आणि मनपाकडून संयुक्त छापा मारून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
> “छेड़ानगर परिसरात अवैध लॉजिंग आणि वेश्यावृत्तीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिस आणि प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देऊन कडक पावलं उचलली पाहिजेत,” असं स्थानिक नागरिकांचं मत आहे.