मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून २ लाखांची फसवणूक; हिम्मतराव निंबाळकर अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मंत्रालयात शिपायाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या हिम्मतराव निंबाळकर (वय ४०) या आरोपीस मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अखेर अटक केली आहे. फेब्रुवारीपासून फरार असलेला निंबाळकर साताऱ्यात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी तक्रारदाराची आरोपीशी ओळख आमदार निवासातील उपाहारगृहात झाली होती. स्वतः मंत्रालयात कामाला असल्याचे सांगून निंबाळकरने तक्रारदाराच्या भावाला साताऱ्यातील सत्र न्यायालयात शिपायाची नोकरी तसेच टपाल विभागात आणखी एका नोकरीची हमी दिली होती. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने बनावट नियुक्तीपत्र दाखवले आणि पुढील प्रक्रियेसाठी दोन लाख रुपये मागितले.
तक्रारदाराने सुरुवातीला २० हजार रुपये ‘गुगल पे’द्वारे आणि नंतर १ लाख ८० हजार रुपये बँक हस्तांतरणाद्वारे दिले. मात्र बराच काळ उलटूनही नोकरी मिळाली नाही. विचारणा केली असता निंबाळकर टाळाटाळ करू लागला, त्यानंतर तक्रारदाराने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणी फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी तपासादरम्यान निंबाळकर साताऱ्यात असल्याचे निष्पन्न केल्यानंतर तेथे जाऊन त्याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, निंबाळकरने स्वतःला सरकारी कर्मचारी असल्याचे भासवून विविध व्यक्तींकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्कम उकळली आहे. त्याच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातदेखील फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. आरोपीने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू असल्याचे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सांगितले.