वाड्यातील आश्रमशाळेत नववी-दहावीत शिकणाऱ्या २ विद्यार्थांची आत्महत्या;संपूर्ण परिसरात खळबळ

Spread the love

वाड्यातील आश्रमशाळेत नववी-दहावीत शिकणाऱ्या २ विद्यार्थांची आत्महत्या;संपूर्ण परिसरात खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि पालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत विद्यार्थ्यांची नावे देविदास नावले (१० वी) आणि मनोज वड (९ वी) अशी आहेत. हे दोघेही मोखाडा तालुक्याचे रहिवासी असल्याचे समजते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री साधारण १ वाजण्याच्या सुमारास या दोघांनी कपडे वाळायला टाकण्याच्या दोरीने आश्रमशाळेच्या परिसरातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

आंबिस्ते येथील या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे शाळेतील वातावरण शोकाकुल झाले आहे. मात्र, या विद्यार्थ्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, या आत्महत्येचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

या घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कायदेशीररित्या पंचनामा केला असून, या दुहेरी आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर, आदिवासी विकास विभागाचे जव्हार प्रकल्प अधिकारी देखील घटनास्थळी हजर राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या गंभीर प्रकरणामागील सत्य लवकर उघड होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon