चेंबूरच्या वाशी नाक्यावर खुलेआम ड्रग्जचा धंदा; आरसीएफ पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – चेंबूर (पूर्व) येथील वाशी नाका परिसरात नसीरीन आणि फिरोज उर्फ लंगडा या दोन कुख्यात ड्रग्ज माफियांकडून खुलेआम गांजासह अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्थानिकांच्या मते, या रॅकेटद्वारे दररोज तब्बल २५ ते ४० किलो गांजाची विक्री केली जाते. या सर्व प्रकाराकडे आरसीएफ पोलिस ठाण्याने डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नसीरीन आणि फिरोज हे त्यांच्या साथीदार वसीम, शाहरुख, सोहेल (नसीरीनचा भाऊ) आणि १५ जणांच्या टोळीसह परिसरात घाऊक आणि किरकोळ प्रमाणात ड्रग्ज विकतात. या टोळीचे संबंध काही गुन्हेगारी गट आणि प्रभावशाली राजकीय व्यक्तींशी असल्याची माहिती समोर आली आहे.
या बेकायदेशीर धंद्यातून मिळालेल्या पैशातून टोळीने वाशी नाका, म्हाडा कॉलनी, माहुल गाव आणि आसपासच्या भागात तब्बल ५० खोल्या, १५ दुकाने आणि १५ वाहने विकत घेतल्याचे समजते. याशिवाय, गरीबांना १० ते २० टक्के व्याजाने पैसे देऊन त्यांच्या घरांची कागदपत्रे ताब्यात घेऊन मालमत्ता बळकावण्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
तेल टँकरमधून गांजा वाहतूक
गांजाची तस्करी इतर राज्यांतून तेल आणि गॅस टँकरमध्ये लपवून मुंबईत केली जाते. एक किलो गांजा सुमारे ₹२०,००० ला विकत घेऊन ₹३०,००० ते ₹५०,००० दराने विकला जातो. दररोज १५ ते २० लाख रुपयांचा अवैध व्यापार या रॅकेटमार्फत चालवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या टोळीकडून ट्रकचालक, कॅबचालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेतात. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी, अपघात आणि छेडछाडीसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ मोहिमेला धक्का
राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ मोहिम राबवून जनजागृती सुरू केली असली तरी, वाशी नाका परिसरातील या जाळ्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत आहे. पोलिसांकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिक संतप्त आहेत.
स्थानिकांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. नसीरीन, फिरोज, वसीम, शाहरुख आणि त्यांच्या साथीदारांविरोधात कठोर कारवाई करून या ड्रग्ज रॅकेटला आळा घालावा, अशी जनतेची मागणी आहे.