पूरग्रस्तांच्या आयुष्यात नवजीवनाचा किरण… पण हा उपक्रम नेमका कोणाचा?
रवि निषाद / वार्ताहर
गेवराई – मराठवाड्यातील विध्वंसक पुरानंतर हजारो शेतकरी उद्ध्वस्त झाले. घरं, शेती, जनावरे सगळं वाहून गेलं. जगण्याची आस हरवलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत हतबलतेची छाया होती. अनेकांनी केवळ दिलासा आणि आश्वासनांची वचने दिली; मात्र एक जण खऱ्या अर्थाने मदतीसाठी मैदानात उतरला—हाजी अरफात शेख.
महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक समाज, नव भारतीय शिव वाहतूक संघटना आणि भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे प्रमुख म्हणून हाजी अरफात शेख यांनी “पशुधन वाटप” या अभिनव उपक्रमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा नवजीवन फुंकले. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जनावरे, अन्नधान्य किट, तसेच आवश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर उपजीविकेचा आधार पुन्हा उभा केला.
“शेतकऱ्याला केवळ मदतीची नव्हे, तर नव्या आशेची गरज आहे,” असं सांगत हाजी अरफात शेख यांनी भावनिक संदेश दिला. पूरामुळे हजारो जनावरे वाहून गेली होती; त्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता. अशा वेळी ‘पशुधन वाटप’ उपक्रमाने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवलं.
या उपक्रमादरम्यान अभिनेते शहजाद खान, मराठवाडा संपर्क प्रमुख जावेद कुरेशी, सरचिटणीस विनय मोरे, तसेच वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गावकऱ्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू, आणि हाजी अरफात शेख यांना दिलेली “धन्यवादाची सलामी”—हीच या उपक्रमाची खरी कमाई ठरली.
कार्यक्रमाच्या शेवटी हाजी अरफात शेख म्हणाले, “मी तुमच्या घरातीलच एक सदस्य आहे. विद्यार्थ्यांसाठीही लवकरच मदतवाटप करणार आहे.” पूरानंतर उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जगण्यात पुन्हा प्रकाश फुलवणारा हा उपक्रम म्हणजे मानवतेचा खरा संदेश ठरला आहे.