मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, महिलेसह चार प्रवासी गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दादर परिसरात रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री उशिरा प्लाझा बस स्टॉपजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, एका महिलेसह चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बस (क्रमांक MH01DR4654, रूट क्र. १६९) वरळी डेपोवरून प्रतिक्षानगर आगाराकडे परतत होती. दरम्यान, प्लाझा बस थांब्याजवळ थांबण्यासाठी येत असताना दादर टी.टी.कडून शिवाजी पार्कच्या दिशेने वेगाने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने बसला जोरदार धडक दिली. या धडकेचा इतका जोर होता की बस अनियंत्रित होऊन थेट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर आदळली.
धडकेनंतर बसचा पुढील टायर फुटला, समोरील काच फुटली आणि बस स्टॉप परिसरात गोंधळ उडाला. टेम्पो ट्रॅव्हलरने यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टॅक्सी आणि टुरिस्ट कारलाही जोरदार धडक दिली. या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात शहाबुद्दीन (३७) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर जखमींमध्ये राहुल अशोक पडाले (३०), रोहित अशोक पडाले (३३), अक्षय अशोक पडाले (२५) आणि विद्या राहुल मोते (२८) या चौघांचा समावेश असून, सध्या सर्वजण सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू असून, वाहनचालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या दुर्घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.