दिल्लीतील आश्रमात १७ मुलींवर लैंगिक छळ; स्वामी चैतन्यानंद फरार, पोलिस शोधमोहीम सुरु
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली – राजधानीतील वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी यांनी लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. एकूण ३२ विद्यार्थिनींनी आश्रमातील बाबाविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यापैकी १७ विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
दिल्लीच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनींनी आपल्या तक्रारीत सांगितले की पार्थसारथी त्यांना अश्लील मेसेजेस पाठवत होता, अश्लील भाषेत बोलत होता आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. तसेच आश्रमातील महिला शिक्षिका, कर्मचारी व वॉर्डनसुद्धा बाबाच्या आदेशांचे पालन करण्यास दबाव टाकत होते, असे पीडितांनी सांगितले.
वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात पार्थसारथीविरोधात लैंगिक छळ आणि बलात्काराशी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस त्याला पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, पोलीसांनी पार्थसारथीची आलिशान कार जप्त केली आहे. या कारवर आंतरराष्ट्रीय संस्थेच्या बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. तपासात उघड झाले आहे की संयुक्त राष्ट्राकडून असा कोणताही नंबर जारी केलेला नाही. पोलिसांनी संबंधित पुरावे जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. यामध्ये सीसीटीव्ही फूटेज, डिजीटल डिव्हाइसेस, एनव्हीआर व हार्ड डिस्क्स यांचा समावेश आहे.
पोलिसांनी नागरिकांना सूचित केले आहे की, संशयित व्यक्ती फरार आहे आणि कोणत्याही माहितीच्या आधारे तातडीने संपर्क साधावा. या प्रकरणाचा तपास पुढील स्तरावर सुरु आहे.