नेहरू नगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; खंडणीबहाद्दर विजय निकमला पुन्हा अटक
मुंबई : कुर्ला पूर्वेतील नेहरू नगर ठक्कर बप्पा कॉलनी परिसरात घरांची रिपेअरिंग करणाऱ्या ठेकेदारांकडून खंडणी उकळणाऱ्या कुख्यात आरोपी विजय निकमला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. नुकतेच एका प्रकरणात जामिनावर सुटलेल्या या आरोपीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता त्याला पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या.
परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय निकम हा घरांची दुरुस्ती करणाऱ्यांकडून सतत पैसे मागत असे. पैसे देण्यास नकार दिल्यास मनपा व इतर विभागात तक्रारी करून ठेकेदार व घरमालकांचे मोठे नुकसान करण्याची धमकी तो देत होता. अगोदर नोंदवलेल्या प्रकरणात त्याला १४ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा त्याच पद्धतीने खंडणी उकळण्यास सुरुवात केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हा बॅनर-कटआउटच्या नावाखालीही पैसे उकळत होता. फिर्यादीच्या तक्रारीनंतर २० सप्टेंबर रोजी गुन्हा क्रमांक ४३५/२०२५ बीएनएस ३०८(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी निकमला परत अटक केली.
नेहरू नगर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात निकमसोबत इतर काही साथीदारही सामील असल्याचा संशय असून त्यांचीही चौकशी सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या कारवाईनंतर परिसरातील इतर खंडणीबहाद्दर भूमिगत झाले आहेत. नेहरू नगर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.