ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून फसवा शेअर बाजार चालवणारे जेरबंद; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Spread the love

ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून फसवा शेअर बाजार चालवणारे जेरबंद; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून देशभरातील गुंतवणूकदारांची लुबाडणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना जेरबंद केले असून या टोळीने मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, केरळ व कर्नाटक या राज्यांतील शेकडो नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे.

मध्य मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीस आपल्या कंपनीमार्फत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांचा फायदा होईल, असे सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडत त्याने तब्बल १३ लाख ५० हजार रुपये विविध खात्यांवर वळते केले. सुरुवातीला फसव्या ॲपवर गुंतवणुकीवर नफा दाखवण्यात आला. मात्र, पैसे परत घेण्याचा प्रयत्न करताच आणखी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. अखेर संपर्कच तोडल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडिताने पोलिसांकडे धाव घेतली.

तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास करून मशीदबंदर परिसरातील पटवा कबर येथे छापा टाकला. कारवाईत टोळीचा प्रमुख जावेद अन्सारी याला अटक करण्यात आली. त्याच्या कार्यालयातून १३ बँक किट, दोन लॅपटॉप, सहा मोबाईल फोन, आठ नवीन सिमकार्ड, क्रेडिट-डेबिट कार्ड, बनावट आधार व पॅनकार्ड तसेच गुमास्ता परवाने जप्त करण्यात आले.

यानंतर पुढील तपासात अन्सारीच्या टोळीतील रेहानकौशर मेहफुज आलम, अरफत बाबु शेख आणि असिफ शरिफ खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून विविध बँक खात्यांद्वारे देशभरातून आर्थिक व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर हेल्पलाइनवर यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलिसांनी इशारा दिला आहे की, फसवणूक करणाऱ्या खोट्या ॲप्स व अविश्वसनीय शेअर ट्रेडिंग ऑफरपासून गुंतवणूकदारांनी सावध राहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon