ठाणे पोलिस आयुक्तालयात तक्रार निवारण दिन; नागरिकांच्या २०२ तक्रारींवर तत्काळ कार्यवाही
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ठाणे पोलिस आयुक्तालयात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. दिनांक ६ व ७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या उपक्रमात एकूण ३७६ अर्जदारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी २३८ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले.
या तक्रार निवारण कार्यक्रमात सर्व सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान २०२ अर्जांची तत्काळ सुनावणी करून अर्जदारांच्या समक्ष निर्गती करण्यात आली. उर्वरित अर्जदारांनाही पुढील बैठकांमध्ये बोलावून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची योजना आखण्यात आली आहे.
नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून जागच्या जागी निराकरण केल्यामुळे अर्जदारांनी समाधान व्यक्त केले असून ठाणे शहर पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, शैलेश साळवी पोलिस आयुक्तालय, ठाणे शहर यांनी सांगितले.