अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक आंदोलन भोवलं; अतुल खूपसे यांच्यासह १० जणांवर गुन्हा

Spread the love

अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक आंदोलन भोवलं; अतुल खूपसे यांच्यासह १० जणांवर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

सोलापूर : करमाळा येथील पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) अंजना कृष्णा या बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणात कारवाईसाठी गेल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवर धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या समर्थनाची लाट उसळली होती. याच पार्श्वभूमीवर जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे व कार्यकर्त्यांनी करमाळ्यातील कमलाभवानी मंदिरासमोर कृष्णा यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शविला. मात्र, या शांततामय आंदोलनाचे पडसाद वेगळ्याच पद्धतीने उमटले आहेत. करमाळा पोलीस ठाण्यात अतुल खूपसे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३६/२०२५ नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

शनिवारी करमाळ्यातील आई कमलाभवानी मंदिरासमोर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही”, अशा आशयाचे फलक हातात धरले होते. गांधीगिरीच्या पद्धतीने शांततापूर्ण आंदोलन झाल्याचा दावा आयोजकांनी केला असतानाच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगू लागल्या आहेत. स्थानिक राजकीय वातावरणात या कारवाईमुळे चांगलाच खळबळ माजली असून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अंजना कृष्णा यांच्यावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी दाखवलेला पाठिंबा आणि त्यावर झालेली पोलिसांची कारवाई, हे प्रकरण आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon